पुणे, दि. 22 -शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेनंतर महापालिका जवळपास 100 किलोमीटरपेक्षा अधिक रस्ते मुळासकट दुरूस्त करणार आहे. त्यासाठी तब्बल 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील 180 कोटींच्या खर्चाच्या पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच महापालिकेच्या अंदाज समितीत आणखी 38 किलोमीटरच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 142 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
पण, एकाच वर्षात इतक्या खर्चाची कामे करणे शक्य नसल्याने यातील काही कमी केली जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक रस्त्याची जागेवर जाऊन तपासणी करणे आणि तसा प्राधान्यक्रम ठरवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत.
महापालिकेकडून दरवर्षी शहरात पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे दुरुस्ती, रिसर्फेसिंग तसेच पूर्ण रस्ता नव्याने डांबरीकरण करण्यासाठी वर्षाला जेमतेम 100 ते 125 कोटींचा खर्च केला जातो. मात्र, यावर्षी शहरात खराब झालेले सर्वच रस्ते सरसकट दुरूस्त करण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. त्यासाठी जवळपास 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील 180 कोटी रूपयांच्या निविदा या पूर्वीच प्रशासनाने जाहीर केल्या असून पुढील काही दिवसांत त्या उघडल्या जाणार आहेत. मात्र, त्यातच, जानेवारी महिन्यात शहरात जी-20 परिषद होणार असल्याने महापालिकेने लगेगच आणखी 38 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 142 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
मुख्य खात्याकडील 30 किलोमीटरच्या 34 रस्त्यांचा समावेश आहे. यामध्ये धायरी, कोथरूड, औंध, कात्रज, हडपसर, नगर रस्ता यासह शहराच्या सर्व भागातील रस्ते आहेत. डिसेंबरअखेर रस्त्यांवर तब्बल 320 कोटींचा खर्च पालिकेस करावा लागणार आहे. पण, तितकी तरतूद प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
अनेक रस्त्यांची दुरुस्ती रद्द होणार
या रस्त्यांच्या खर्चाना अंदाज समितीने मान्यता दिली असली तरी, त्यात असलेले सर्वच रस्ते दुरूस्त केले जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे, महापालिका आयुक्तांनी पथ विभागाने दुरूस्तीसाठी निश्चित केलेल्या रस्त्यांची खरचं दुरूस्ती करणे आवश्यक आहे का हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष दुरूस्त करण्यात येणारा संपूर्ण रस्ता जागेवर जाऊन पाहण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मान्य केलेल्या रस्त्यांमधील अनेक रस्ते निधी अभावी रद्द केले जाण्याची शक्यता आहे. तसेच या रस्त्यांची पुढील वर्षी पावसाळ्यापूर्वी केले जाण्याची शक्यता आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार दुरुस्तीसाठी निश्चित केलेल्या रस्त्यांची पाहणी केली जात आहे. या पाहणीनंतर कोणते रस्ते लगेच करायचे आणि कोणते काही कालावधीने निर्णय घेतला जाईल. त्यामुळे तातडीने दुरूस्त केल्या जाणाऱ्या रस्त्यांनाच प्राधान्य दिले जाईल.
– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, मनपा