पुणे – महिला व बाल कल्याण विभागाच्या मार्फत शून्य ते सहा वर्ष वयोगटाच्या बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने महिला व बालकल्याण विभागाकडे केली आहे. केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी पोषण आहार दिला जातो. हा पोषण आहार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांची असते.
परंतु सद्य परिस्थितीत अंगणवाडी सेविका या त्यांच्या मागण्यांसाठी संपावर असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन या भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहार पुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी पोषण आहार वितरीत करताना संपाचे कारण सांगत अडथळे देखील आणले जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यापासून या भागात पोषण आहार वितरित झालेला नाही.
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी दिलीप हिवराळे यांची भेट घेऊन अंगणवाडी सेविका संपावर असल्याने पर्यायी व्यवस्था उभारून पोषण आहार लाभार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याची मागणी केली. अंगणवाडी सेविकाच्यां संपामुळे पोषण आहार वितरणात जर काही अडचणी निर्माण होत असतील तर हा पोषण आहार वितरित करण्याची जबाबदारी घेऊ आणि शासकीय योजना यशस्वी करण्यात योगदान देऊ, महिला अध्यक्ष सुरेखा भोसले यांनी सांगितले.
या सर्व मागण्यांना महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी दिलीप हिवराळे यांनी गांभीर्याने घेण्याचे आश्वासन देत लवकरात लवकर कारवाई करू असे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी आम आदमी पक्षातर्फे सुरेखा भोसले, आरती करंजावणे, रेखा यादव, छाया भगत, अमोल मोरे, प्रदीप उदागे व अमोल काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.