पुणे – नागरिकांना पाण्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाची तक्रार आता महापालिकेला 24 तास करता येणार आहे. येत्या 1 मार्च पासून पालिका प्रशासनाकडून 24 तास हेल्पलाईन सेवा सुरू केली जाणार असल्याची माहीती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली.
महापालिकेकडून शहरातील सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी पीएमसी केअर हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. मात्र, अनेकदा ही हेल्पलाईन बंद असते तसेच पाणी हा दैनंदिन गरजेचा विषय असतानाही त्याबाबतच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. त्यामुळे, महापालिकेकडून ही हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच समान पाणी योजनेअंतर्गत महापालिकेस पाण्याची 24 तास हेल्पलाईन असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आता पाणी कमी येणे, कमी दाबाने येणे, जलवाहिनी फुटणे तसेच पाण्याबाबतच्या इतर सर्व प्रकारच्या तक्रारी या हेल्पलाईनवर करण्यात येणार आहे. तक्रारीसाठी 020 – 25501383 हा हेल्पलाईन क्रमांक आहे.