पुणे – लष्कर परिसरातील रहिवासींच्या नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी, तसेच ई-गर्व्हर्नन्सचा प्रभावी वापर वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने “ई-छावणी पोर्टल’ हे डिजिटल माध्यम उपलब्ध केले आहे. यावरील विविध सुविधांचा लाभ सुमारे दहा हजार नागरिकांनी घेतल्याची नोंद पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने घेतली आहे.
संरक्षण मंत्रालयाने देशभरातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. यावरून व्यापार परवाना, जन्म आणि मृत्यू नोंद, मालमत्ता कर, पाणीपट्टी, कम्युनिटी हॉलचे बुकिंग अशी विविध कामे करता येतात. तसेच एखाद्या स्थानिक समस्येबाबत तक्रारदेखील करता येते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाद्वारे हे माध्यम छावणी परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे विविध कामे ऑनलाइन करणे नागरिकांना शक्य होत आहे.
याबाबत बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार म्हणाले, “ई- छावणी पोर्टल छावणी परिषदेतील नागरिकांसाठी उपयुक्त आणि सोयीस्कर आहे. नागरी सुविधांचा लाभ घेता येत असल्याने, नागरिकही उत्साहाने या पोर्टलचा वापर करतात. या व्यासपीठाचे महत्त्व म्हणजे थेट केंद्रीय यंत्रणेकडून कामकाजावर देखरेख ठेवली जात असल्याने, स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांवर वचक बसत आहे. एखाद्या तक्रारीचे निराकरण करण्यास उशीर झाल्यास, त्याचे स्पष्टीकरणदेखील बोर्ड प्रशासनाला द्यावे लागते. त्यामुळे पोर्टलवरील कामे तातडीने करण्यास प्रत्येक अधिकारी प्राधान्य देतो.’
70 टक्के नोंदणीचा अट्टहास
छावणी परिसरातील 70 टक्के नागरिकांचे ई-छावणी पोर्टलवर नोंदणीकरण करण्याचे बंधन संरक्षण मंत्रालयाने कॅन्टोन्मेंट बोर्डांवर टाकले आहे. मात्र, या नोंदणीसाठी बोर्ड प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतो आहे. यामध्ये नागरिकांकडे स्मार्ट मोबाइल नसणे, त्यांना ऍप-मोबाइलचा वापर करता न येणे अशा कारणांचा समावेश आहे.
“ई-छावणी’ बाबत पुण्यातील नोंदी
नोंदणी केलेले नागरिक 9369
व्यापार परवानासाठी दाखल अर्ज 169
एकूण तक्रारी 1,500
निराकरण झालेल्या तक्रारी 1,140
तक्रार निवारणासाठीची मुदत 3 ते 9 दिवस