पौड (वार्ताहर) – लोकसभा निवडणुकीचं गारुड सर्वत्र दिसू लागलं आहे. निवडणुकीचे ४ टप्पे पार पडले असून पुणे जिल्ह्यातल्या सर्व जागांची निवडणूक पार पडली आहे. ४ जूनला संपूर्ण लोकसभेचा निकाल लागणार आहे. मात्र, तत्पूर्वी कोण बाजी मारणार यावर पैजांचा आडाखा सुरू असून मुळशीत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने चक्क लाखमोलाची पैंज लावली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार भाजप ३५० जागांवर विजयी होणार असून तसे न झाल्यास एक लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.
या निवडणुकीत नागरिक कोणाच्या बाजूने कौल देणार आहे, हे मात्र मतदान पेटीत बंद झालेले असताना याबाबत पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, व्यावसायिक, नागरिक यांचा मध्ये जागोजागी चर्चा होताना दिसत आहे. याच चर्चेमधून ही एक लाखाची पैज मात्र लागली आहे.
मुळशीतील भाजपा कार्यकर्ते आणि एक व्यावसायिक यांच्यामध्ये पौड (ता.मुळशी) येथील स्वराज हॉटेलमध्ये चहा पिताना चर्चेदरम्यान भाजपा कार्यकर्ता म्हणाला की, ३५० जागांवर खासदार निवडून येतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत या पेक्षा एक जरी जागा कमी आल्यास मी एक लाख रुपये या व्यावसायिकास देईल, असे सांगितले.
व्यावसायिकाने एक लाखांची पैज…
तर ३५० जागांवर खासदार आले तर व्यवसायिकाने भाजपा कार्यकर्ते यास एक लाख रुपये देण्याचे ठरले आहे. याची मध्यस्थी त्यांच्या मित्रांनी केली असून त्यांच्याकडे रक्कम देण्याचे ठरले आहे. त्यामुळे येत्या काळात सरकार कोणाचे लागणार यावरी नागरिकांमध्ये तसेच कार्यकर्तांमध्ये पैजेची चढाओढ मात्र होताना दिसत आहे.