पुणे – बलात्कारामुळे 24 आठवडे गर्भवती राहिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पीडित तरूणीला पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामुळे दिलासा मिळाला आहे. तिचा गर्भपात करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यापासून ससून रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी लागणारी प्रक्रीया केवळ 15 दिवसात पूर्ण करण्यात आली. प्रकरण दुसऱ्या जिल्ह्यातील असतानाही प्रकरण गांभीर्याने घेत विधी सेवा प्राधिकरणातर्फे मदत करण्यात आली.
विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून महिलांना विविध समस्यांवर कायदेशीर मोफत मदत केली जाते. काही आठवड्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील तरुणीवर कठीण प्रसंग आला होता. ती तरूणी मोलमजुरी करून अर्थाजण करत असत. कामाला असलेल्या ठिकाणच्या मालकाने तिच्यावर अत्याचार केला.
याबाबत पीडितेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल केल्यावर नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात पीडीत तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. त्यामध्ये ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. परंतु, करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा धोका लक्षात घेऊन पीडीतेला अहमदनगर पोलिसांनी येथील ससून रुग्णालय येथे पाठविले. ससून रुग्णालय येथे तिच्या वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण होत असताना अहमदनगर पोलिसांच्या पथकाने येथील विधी सेवा प्राधिकरणाकडे मदत मागितली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे, विधी सेवा प्राधिकरणाचे तत्कालीन सचिव चेतन भागवत, विद्यमान सचिव प्रताप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली.
उच्च न्यायालयात ऍड. तेजस दंडे, ऍड. गढवी यांनी पीडितेची बाजू मांडली. ससून रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालाची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेऊन योग्य ती काळजी घेऊन तिचा गर्भपात करण्याचा आदेश दिला. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. मानसिंह साबळे, प्रसुती आणि शल्य चिकित्सालय विभागाचे प्रमुख डॉ. रमेश भोसले, अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भपाताची प्रक्रिया पार पडली. तपासी अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, महिला पोलीस शीतल लवारे, थोरात, सशिंदे आणि पोलीस कर्मचारी यांनी पीडीत मुलीला सहाय्य केले.