पुणे –शहरात रविवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. तर, पुढील दोन दिवस शहरात हलक्या स्वरूपाचा आणि घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पूर्व विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाला आहे. मागील 24 तासांत विदर्भात बऱ्याच ठिकाणी, कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पुढील दोन दिवस (31 ऑगस्टपर्यंत) कोकण गोवा, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात सोमवारी (30 ऑगस्ट) तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
तर, पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.