वाघोली – आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील जागेत बळजबरीने अतिक्रमण व शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्षासह सहा जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मीरा रोजरीओ बरेटो (वय 63, रा. टिंगरे नगर) यांनी फिर्याद दिली. यानुसार दादा सातव, त्यांची पत्नी, निलेश आप्पा सातव, योगेश आप्पा सातव, उमेश आप्पा सातव, संगीता आप्पा सातव, आश्विनी निलेश सातव (सर्व रा. वडजाई, वाघोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मार्च रोजी आव्हाळवाडी येथील हद्दीतील गट नंबर 901 मधील चार हेक्टर 48 आर पैकी फिर्यादी यांच्या मालकीच्या 38 आर व त्यांचा भाऊ नरेंद्र बहादूर छेत्री यांचे नावे असलेल्या वीस आर क्षेत्रात ताबा, वहिवाट, मालकी हक्क असताना दादा बबन सातव व इतर यांनी संगनमत करून त्यांचा कोणताही मालकी हक्क नसताना मालकी हक्क संदर्भात खोटे मजकुराचा बोर्ड लावला.
बळजबरीने अतिक्रमण करून शिवीगाळ व दमदाटी करून पोल काढून घेऊन तोडून त्याचे नुकसान केले. जागेत कंपाउंड करण्यासाठी आलेल्या जेसीबी चालकाला देखील धमकवल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे हे करीत आहेत.