पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पुणे महानगर नियोजन समितीच्या 30 सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज बुधवारपासून (दि.29) दाखल करता येणार आहे.
या निवडणुकीसाठी मतदान दि.10 नोव्हेंबर रोजी, तर मतमोजणी दि.12 नोव्हेंबरला होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
“पीएमआरडीए’ने नुकताच प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यावर नागरिकांनी हरकतीसुद्धा नोंदवल्या आहेत. पुणे महानगर नियोजन समितीवर निवडणुकीच्या माध्यमातून 30 सदस्य निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
असे निवडले जातील सदस्य
महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये “पीएमआरडीए’ हद्दीतील ग्रामीण भाग (जिल्हा परिषद), लहान नागरी क्षेत्र (नगरपरिषद) आणि मोठे नागरी क्षेत्र (महानगरपालिका) गटातून एकूण 30 सदस्य निवडून द्यायचे आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांमधून 22 सदस्य, नगरपरिषद क्षेत्रातून 1 सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचांमधून 7 सदस्य निवडण्यात येणार आहे. उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
दि.29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर
(वेळ सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत)
उमेदवारी अर्जांची छाननी दि.18 ऑक्टोबर 2021
वैध उमेदवारी यादी प्रसिद्ध दि.22 ऑक्टोबर 2021
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक दि.25 ऑक्टोबर 2021
उमेदवारांची अंतिम
यादी प्रसिद्ध दि.26 ऑक्टोबर 2021
मतदान दि.10 नोव्हेंबर (मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 5)
मतमोजणी दि.12 नोव्हेंबर (सकाळी 8 वाजता)