पिंपरी – महापालिकेच्या कासारवाडीतील जलतरण तलावात क्लोरीन गॅसची गळती होऊन 19 जण अस्वस्थ झाले होते. याप्रकरणी जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरणसह इतर कामकाज दिलेल्या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे भोसरी पोलिसांनी बुधवारी (दि.11) सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावावर मंगळवारी (दि.10) क्लोरीन वायुच्या सिलेंडरला गंज चढल्यामुळे गॅस गळती झाली. या जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरणसह इतर काम मे सुमित स्पोटर्स ऍन्ड फिटनेस इक्विपमेंटस यांना नेमून दिलेले आहे.
क्लोरिन गॅसची टाकी गंजलेली व जीर्ण झालेली होती. एजन्सीने आवश्यक खबरदारी न घेतल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या एजन्सीला महापालिकेच्या वतीने नोटीस दिलेली असून खुलासा मागितला आहे. गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, बुधवार सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तसेच याच एजन्सीकडे पालिकेच्या आणखी सात जलतरण तलावाचे काम आहे.
दरम्यान, महापालिका संबंधित एजन्सीकडे चौकशी करणार आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे भोसरी पोलिसांनी सांगितले.