कात्रज : रस्त्याच्या खोदकामात आढळून आलेला पेशवेकलीन पाण्याचा उचछ्वास.
पुणे – कात्रज तलावातून शनिवारवाड्यात पाणी आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पेशवेकलीन पाण्याचा उचछ्वास रस्त्याच्या कामात पुन्हा एकदा आढळून आला. ट्रेझर पार्क ते शिवदर्शनपर्यंत महापालिकेकडून रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण केले जाणार असून त्यासाठी करण्यात आलेल्या खोदाईत हा पाण्याचा उच्छवास आढळून आला आहे.
महापालिकेने तातडीने ही माहिती इतिहास अभ्याक श्रीकृष्ण भागवत यांनी कळविली असून त्यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. दरम्यान, या ऐतिहासिक वारशाला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने त्याचे संवर्धन करण्याचे काम सुरु केले जाणार असून त्यासाठी भागवत यांच्याकडून महापालिका मार्गदर्शन घेणार आहे.
…असा सापडला उच्छवास
तावरे बेकरी चौकात खोदकाम सुरु असताना रस्त्याच्या मध्यभागी जुने बांधकाम असलेली जलवाहिनी लागली. अधिकाऱ्यांना याची तपासणी केला असता ही कात्रजच्या तलावातून शनिवारवाड्याला जाणाऱ्या पेशवेकालीन पाण्याच्या जलवाहिनीचे उच्छवास असल्याचे स्पष्ट झाले.
या जलवाहिनीतून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याचेही यावेळी निदर्शनास आले. त्यानंतर, महापालिकेने या ठिकाणी माहिती फलक लावण्याचा निर्णय घेतला असून भागवत यांनी हा रस्ता सिमेंटने बंद न करता त्यावर रस्ता पातळी पर्यंत वीट बांधकाम करून एचडी सिमेंट कव्हर बसविण्याच्या सूचना केल्या आहेत