पुणे – चाल सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड आॉनलाइन मिळत आहेत. सोबतच जमाबंदी आयुक्त कार्यालय अर्थात भूमि अभिलेख विभागाने आता जुने सात-बारा उतारे, फेरफार नोंदवही, जमिनींचे नकाशे, टिपण आदी प्रकारचे अभिलेख आॉनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुने अभिलेख आता नागरिकांना भूमि अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर घरबसल्या मिळणार आहेत.
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत भूसंसाधन विभागाकडून राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून भूमि अभिलेख व्यवस्थापनासाठी आधुनिक व पारदर्शक प्रणाली निर्माण करणे व अंतिमत: जमिन विषयक मालकी हक्काची निर्णायक शाश्वती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्र्मांतर्गत जुने अभिलेख नागरिकांना आॉनलाॅइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जमिनीविषयक जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याकरिता ई अभिलेख (ई रेकॉर्ड ) हा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे.
जुने सातबारा उतारे, फेरफार , जुन्या मिळकत पत्रिका आदी अभिलेख असांक्षाकित अभिलेख केवळ पाहण्यासाठी aapleabhilekha.mahabhumi.gov.in/ercords या संकेतस्थळावर जनतेस विनामूल्य उपलब्ध आहेत. तर नागरिकांना विविध कारणांसाठी आपल्या मालमत्तेसंबंधित जुन्या अभिलेखांच्या साक्षांकित प्रतीची आवश्यकता असते, असे अभिलेख नागरिकांना mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर सशुल्क उपलब्ध करून दिले आहेत. उर्वरित अभिलेख जसजसे साक्षांकित होतील, तसतसे जनतेस उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रिंटदेखील नागरिकांना काढता येणार आहे.
स्कॅनिंग कामकाज अंतिम टप्प्यात
“मुंबई शहर वग़ळता 35 जिल्ह्यांतील सर्व तहसिल, भूमि अभिलेख व नगर भूमापन कार्यालयातील जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग कामकाज अंतिम टप्प्यात असून सद्यस्थितीत 22 जिल्ह्यांचे स्कॅनिंग कामकाज पूर्ण होऊन आॉनलाइन अपलोड करण्यात आले आहेत. 22 जिल्ह्यांचे स्कॅनिंग जे अभिलेख डिजिटली स्वाक्षरी झालेले ते अभिलेख महाभूमि या संकेतस्थळवर सशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.” – सरिता नरके, प्र. अपर जमाबंदी आयुक्त, भूमि अभिलेख