पुणे – शहरातील रस्त्यांचा “वॉकिंग सर्व्हे’ करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. पथ विभाग कनिष्ठ अभियंता तसेच उप अभियंत्यांना आठवड्यातून दोन दिवस आपल्या हद्दीतील चार ते पाच किलोमीटर रस्त्याची चालत पाहणी करावी लागणार आहे. तसेच त्याचा अहवाल प्रत्येक आठवड्याला वरिष्ठांना सादर करावा लागणार आहे.
रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा चुराडा करूनही पुणेकरांना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागतो. तर नागरिकांनी तक्रार केल्यानंतर अथवा माध्यमांमध्ये संबधित रस्त्याची दुरावस्था समोर आल्यानंतरच खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाकडून रस्ते दुरूस्ती केली जाते. त्यामुळे रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने अभियंत्यांसाठी नियमावली तयार केली आहे.
यात “वॉकिंग सर्व्हे’चाही समावेश आहे. शहरात सुमारे 1,400 किलोमीटरचे रस्ते असून, त्यातील सुमारे 500 किलोमीटरचे रस्ते 12 मीटरपेक्षा अधिक मोठे आहेत. या रस्त्यांचे काम मुख्य खात्याकडून पाहिले जाते. त्यासाठी 7 विभाग करण्यात आले असून, त्याअंतर्गत 40 कनिष्ठ अभियंते तसेच 20 पेक्षा अधिक उप अभियंत्यांवर आहे.
अशी असेल निरीक्षण मोहीम
हे अभियंते रस्त्याची सद्यस्थिती, वाहतुकीचा ताण, पदपथ, वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे, गतिरोधक, रस्त्याच्या आसपास पडलेला राडारोडा, खड्डे, पदपथाचे कर्बिंग याची पाहणी करतील. त्यानुसार त्याचा ठिकाणनिहाय अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर करतील. ज्या ठिकाणी तातडीनं दुरुस्ती आवश्यक आहे, ती कामे लगेच करतील. तर क्षेत्रीय कार्यालयांची कामे त्यांना कळवतील.
असा होईल फायदा…
- प्रत्यक्ष जागेवरील स्थिती अधिकाऱ्यांनी माहिती होईल.
- नादुरुस्त रस्त्यांच्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती.
- रस्त्यांवर येणारे अडथळे तातडीने काढता येतील.
- अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी निश्चित होईल.