पुणे जिल्हा: वाल्ह्यातील शेतकरी तेलबियाणांकडे वळला

आंतर पीक म्हणून सूर्यफूल, सोयाबीनची लागवड
वाल्हे –
मागील काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील काही वर्षांपासून शेतकरीवर्ग पारंपरिक शेती पद्धत मोडीत काढत, आधुनिक शेतीकडे वळाला आहे. शेतीमधील आधुनिकीकरणाकडे वळताना शेतकरीवर्गाने तेल बियांकडे मात्र दुर्लक्ष केले होते. मागील वर्षांपासून करोनाचे संकट गडद झाले असतानाच, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले. यानंतर मात्र अनेक शेतकरीवर्गाने, वाढत्या खाद्य तेलाच्या किंमती लक्षात घेऊन, वाल्हे (ता.पुरंदर) परिसरातील शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील बाजरीच्या पिकात अनेकांनी आंतर पीक म्हणून सूर्यफूल, सोयाबीन या तेल बियांची लागवड करून पिके कमी पावसातही योग्य पद्धतीने जपत सुस्थितीत आणली आहेत.

वाल्हे येथील प्रगतशील शेतकरी मनोज भिमाजी भुजबळ यांनी आपल्या 65 गुंठे शेतामध्ये सोयाबीन, सूर्यफुलाची आंतर्गत लागवड केली आहे. हा शेतकरी नेहमी ऊस लागवड करित असतो; मात्र मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किंमती वाढत असल्याने आणि चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी दिसल्यामुळे यांनी ऊस लागवड न करता कमी पाण्यावर येणारे पीक घेतले असून ठिबक सिंचनच्या सहाय्याने पाणी देत आहेत.

या दिवसांमध्ये पाणी ही जास्त लागत नाही; मात्र पावसाने ताण दिल्यामुळे पाणी सोडावे लागते आहे. सोयाबीनचे पिक हे तीन महिन्यांमध्ये येते. तर सूर्यफूल चार महिन्यांमध्ये येत. यावेळेत पावसाचे प्रमाण चागले असेल तर हे पीक निघल्यावर दहाव्या महिन्यांतील ऊस लागवड करता येते. योग्य नियोजन व योग्य धोरण करुन आधुनिक पद्धतीने शेती केल्यास भरघोस उत्पन्न काढता येत असल्याची माहिती शेतकरी मनोज भुजबळ यांनी दिली.

तेल बियांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सद्यःस्थितीत, सोयाबिन हे शेंग भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्याला चंक्रीभुंगा व पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होतो. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी विविध औषध फवारणी करतो.
– गीता पवार,कृषी सहाय्यक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.