वाघोली – पुणे नगर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी व महामार्गाच्या कडेला वाहने पार्किंग केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. म्हणून वाघेश्वर चौक ते लाईफ लाईन हॉस्पिटल पर्यंत दोन्ही बाजूने नो पार्किंग करण्यात आली असल्याचा आदेश पुणे वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी काढला आहे. वाहतूक पोलिसांच्या वतीने काढण्यात आलेला हा आदेश तात्पुरत्या स्वरुपाचा आहे.
नो पार्किंगच्या आदेशाबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना असल्यास 9 जुलै पर्यंत येरवडा येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सूचना व हरकतींचा विचार करून पुढील अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत.
वाघोलीमध्ये होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभाग पोलिसांच्या वतीने उपाय योजना करण्यात येत असून वाघेश्वर चौक ते लाईफ लाईन हॉस्पिटल दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत असतात. वाहनाच्या होणाऱ्या पार्किंग मुळे वाघेश्वर चौक ते लाईफ हॉस्पिटल पर्यंत पार्किंग करण्यात आले असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक कोंडी दूर होईल असा प्रयत्न वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, फायर ब्रिगेडची वाहने, या आदेशातून वगळण्यात आली आहेत.
वाघोली मधील नो पार्किंगचा आदेश वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपयोगी आहे. मात्र नागरिकांना पार्किंगची व्यवस्था देखील वाहतूक विभागाने करणे गरजेचे आहे. तरच वाघोलीतील लहान-मोठे व्यावसायिक टिकतील. अन्यथा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.
– रामभाऊ दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य
पुणे नगर रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. याबाबतीतील लेखी निवेदने वाहतूक विभागाला दिली आहेत. रोज रात्री अपरात्री होणारी वाहतूक कोंडी ट्रॅव्हल्स गाड्यांमुळे होत असल्याने त्यांच्यावर कारवाईची गरज आहे.
– संदीप सातव,माजी उपसरपंच, वाघोली