वाघोली (प्रतिनिधी) : व्हॅन मालका सोबत न्यायालयात गेल्याचा राग मनात धरून स्कूल व्हॅन चालकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाघोलीतील बकोरी फाटा येथे बीजे एस कॉलेज जवळ सोमवारी (दि.४) सकाळी नऊ च्या सुमारास घडली. या हल्ल्यामध्ये व्हॅनच्या काचाच फुटल्या असल्यातरी कोणीही गंभीर जखमी झाले नाही. यावेळी व्हॅन मध्ये आठ विद्यार्थी होते.
याप्रकरणी सचिन इंगोले (वय २७, वाघोली) या व्हॅन चालकाने फिर्याद दिली असुन हल्ला करणाऱ्या अल्पवयीन तरुणासह आकाश तोरंभे (रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोहन कदम हा व्हॅन मालक आहे. त्याच्याकडे इंगोले हा चालक म्हणून काम करतो. कदम यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची सहा फेब्रुवारी २०२४ रोजी न्यायालयात तारीख होती. इंगोले हा कदम याच्या सोबत न्यायालयात गेला होता.
न्यायालयात का गेला याचा राग मनात धरून त्याने मित्राच्या सहाय्याने स्कूल मधून व्हॅन निघाल्यानंतर चालकावर कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. व्हॅनची पुढील व चालकाच्या बाजूची काच या हल्यात फुटली. पुढे बसलेल्या विद्यार्थ्याला ही काच लागून तो किरकोळ जखमी झाला. या प्रकाराने घाबरलेले विद्यार्थ्यांनी आरडा ओरडा केला.
यानंतर हे हल्लेखोर पळून गेले. या प्रकाराने व्हॅन मधील विद्यार्थी घाबरले होते. ही घटना कळताच पालक शाळेत पोहचले व मुलाना घरी नेले. भर रोडवर हा हल्याचा प्रकार घडला. व्हॅन मध्ये असणारी मुले ५ वी ते ९ वी वर्गातील होती. यामध्ये दोन मुलींचाही समावेश होता. या घटनेने पालक वर्गातही चिंतेची बाब पसरली