पुणे – अपर पोलीस आयुक्तांसमोर गोंधळ घालत महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात मोबाईल मारण्यात आला. या प्रकरणी एका महिलेस बंडगार्डन पोलिसांनी अटक (Pune Police) केली आहे. श्वेता प्रमोद कदम (रा.येरवडा गावठाण) असे अटक महिलेचे नाव आहे.
महिलेच्या पतीची येरवडा परिसरात पान टपरी आहे. ही टपरी रात्री उशीरापर्यंत सुरु असताना रात्रगस्तीवरील अधिकाऱ्यांनी ती बंद करण्यास सांगितले होते. तेव्हा झालेल्या वादातून श्वेता यांनी गसतीवरील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली होती (Pune Police) .
या तक्रार अर्जाची चौकाशी सहायक पोलीस आयुक्तांमार्फत सुरु होती. सहायक पोलीस आयुक्तांनी सुनावणी दरम्यान बोलवल्यावर त्यांच्या गाडीला दुचाकी आडवी घालून त्यांनाही दमदाटी करण्यात आली होती. यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान सहायक पोलीस आयुक्तांनी पाठवलेल्या अहवाल अपर पोलीस आयुक्तांकडे आला होता. या अनुषंगाने अपर पोलीस आयुक्त श्वेता यांना अहवाल समजून सांगत होते. मात्र अहवाल मनाप्रमाणे आला नसल्याने तीने गोंधळ घालण्यास सुरवात केली. यामुळे तीला कार्यालयातून बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले.
महिला पोलीस हवालदार राखी खवले तीला बाहेर घेऊन जात होत्या. मात्र तीने खवले यांच्या डोक्यात मोबाईलने मारहाण करुन बघुन घेण्याची धमकी दिली. तीला बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यावर त्यांच्याशी देखील झटापट केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तांगडे करत आहेत