पुणे : एका कंपनीत २३ वर्षांपासून मशीन ऑपरेटर म्हणून काम करीत असणा-या कर्मचा-याचा खून केल्याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस नेता दयानंद इरकल याच्यासह आठ जणांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर शिंदे यांनी फेटाळला.
राष्ट्रवादी काँग्रेस नेता दयानंद सिद्राम इरकल, शेखर महादेव जोगळेकर, प्रणव शेखर जोगळेकर, बाळू पांडुरंग मिसाळ, प्रमोद श्रीरंग
शिंदे, रुपेश रवींद्र कदम, संतोष उर्फ बंटी दत्तात्रय हरपुडे आणि प्रकाश किशोर नाडकर्णी अशी अटकपूर्व जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणात अविनाश आनंद भिडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी रेश्मा यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात ८ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रेमकुमार अगरवाल यांनी तर, फिर्यादी तर्फे अॅड. श्रीकृष्ण घुगे यांनी न्यायालयात कामकाज पाहिले.
अटकपूर्व जामिनास विरोध केला. आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने हा खून केला आहे. वैद्यकीय अहवालात मयताच्या देहावर जखमेच्या खुणा आहेत. आरोपींनी पतीच्या मृत्यूपूर्वी पत्नीला भेटू दिले नाही. फिर्यादीवर दबाव टाकून त्यांचा पाठलाग करून धमक्या देण्यात आल्या.
पोलिसांकडूनही आरोपींना पाठीशी घालण्यात येऊन फिर्यादीवर दबाव टाकण्यात येत असल्याचा युक्तिवाद अॅड. अगरवाल आणि अॅड. घुगे यांनी केला. हा युक्तिवाद ग्राहय धरीत न्यायालयाने सर्वांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.