पुणे,{प्रभात वृत्तसेवा}: महापालिकेच्या कात्रज येथील भारतरत्न राजीव गांधी प्राणी संग्रहालयात येणार्या पर्यटकांना आता महापालिकेकडून आतमध्ये प्रवेश करताना साहित्य घेऊन जाण्यासाठी मोफत कापडी पिशवी दिली जाणार आहे.
पर्यावरणास धोकादायक असलेले प्लॅस्टिक वापरू नये, याबाबत पर्यंटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, तसेच संग्रहालयाच्या आवारात होणारे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ प्लॅस्टिक पिशवीत साहित्य घेऊन जाणार्या पर्यटकांनाच ही पिशवी मोफत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २० हजार पिशव्या खरेदी केल्या जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली.
सुमारे १९३ एकर जागेत महापालिकेचे प्राणी संग्रहालय विस्तारलेले असून, या ठिकाणी सुमारे साडेचारशे वेगवेगळ्या प्रजातींचे प्राणी आहेत. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वाधिक मोठे प्राणी संग्रहालय असल्याने वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. अनेकदा कुटुंबासह, तसेच सहलीला आलेले पर्यटक, पाण्याची बाटली, तसेच मुलांसाठी आणलेले खाण्याचे साहित्य कॅरीबॅगमधून घेऊन येतात. मात्र, आवारात प्लॅस्टिक वापरण्यास मनाई असल्याने महापालिकेकडून ते काढून घेतले जाते, तर काही नागरिक या पिशव्या खिशात घेऊन जातात. नंतर या पिशव्यांचा कचरा संग्रहालयाच्या आवारात टाकला जातो.
कधीकधी महापालिकेने पिशवी काढून घेतल्यानंतर हे नागरिक गोंधळ घालतात, तसेच साहित्य ठेवण्याची सोय नसल्याने नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, तसेच नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये, याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने उद्यान विभागाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. खाण्याचे अथवा इतर साहित्य प्लॅस्टिक पिशवीत घेऊन आल्याचे आढळल्यास अशा नागरिकांना मोफत कापडी पिशवी दिली जाणार आहे.
पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासह त्यांची गैरसोय होणार नाही, तसेच प्राणी संग्रहालय प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आहे. पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २० हजार पिशव्या घेतल्या जाणार असून, एप्रिलपासून वर्षभरासाठी खरेदी केली जाईल.- अशोक घोरपडे