पुणे – महाराष्ट्रासह देशभरात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली. मात्र, सर्रास प्लॅस्टिक वापर होत असताना दिसून येत आहे. मात्र, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आवारात प्लॅस्टिक वापरावर प्रतिबंध घातले आहेत. विद्यापीठ आवारात बाटलीबंद पाण्याच्या विक्रीवर 1 जानेवारी 2020 पासून प्रतिबंध करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनने घेतला आहे.
यापूर्वी विद्यापीठाने सर्व विभागांना प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते. त्याबाबतचे परिपत्रकही प्रसिद्ध केले होते. त्यानंतरही विद्यापीठातील परिसरात विविध सभा, चर्चासत्र, परिषदा व अन्य कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिक बाटलीबंद पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आता पुन्हा एकदा विद्यापीठाने “प्लॅस्टिकचा वापर करू नका,’ अशा स्पष्ट सूचना सर्व विभाग, उपहारगृह आणि विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ परिसरात प्लॅस्टिकच्या बाटलीबंद वापरावर पूर्णत: प्रतिबंध करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अशा खरेदीची देयके वित्त व लेखा विभागाने अदा करू नयेत. विद्यापीठ आवारात बाटलीबंद पाण्याच्या विक्रीवर उद्यापासून मनाई करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागांनी काटेकोरपणे करावी, असे आदेश विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.