पुणे -राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सदस्यांची संख्या वाढविण्याच्या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा निहाय गट-गणांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेमधील सदस्यांची संख्या 7 ने वाढणार असून 82 तर पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या 14 ने वाढणार 164 इतकी होणार आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 असे करण्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावित करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्यांसाठी गट असतो. तर पंचायत समितीसाठी गण असतो. सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे. राज्य निवडणुक आयोग जिल्ह्यातील गटांतून थेट निवडणुकीद्वारे निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या निश्चित करणार आहे.