पुणे, {अंजली खमितकर} – अशी कला शीक, की ज्यामुळे तू तुझ्या पायावर उभी राहशीलच; शिवाय ते तुझे वेगळेपणही असेल, असे पतीने प्रोत्साहन दिल्यावर वैशाली रासकर यांनी पतीचाच रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्या पतीच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा शिकल्या. आता ही गोष्ट अलिकडची ही नव्हे तर २८ वर्षांपूर्वीची आहे. वैशाली या गेल्या २८ वर्षांपासून रिक्षा चालवतात.
आर्थिक परिस्थिती बेताची होती. कुटुंब मोठे होते. पती हे शाळेच्या मुलांना ने- आण करण्याचे काम करत होते. अन्यही रिक्षा होत्या, ज्या भाड्याने दिल्या होत्या. पतीची इच्छा होती की, मला रिक्षा चालवायला शिकवायचे. जर अंगात कला असेल, तर आपण कधीच उपाशी राहणार नाही, अशी त्यांची शिकवण होती.
पतीनेच प्रोत्साहन दिले आहे, त्यांचीच इच्छा आहे म्हटल्यावर मी घाबरले नाही आणि रिक्षा चालवायला शिकले, असे रासकर सांगतात. आम्ही दोघेही मुलांना ने-आण करण्याचे काम करत होतो. दोघेही दिवसभर एकत्र असायचो त्यामुळे तशी कोणतीच भीती वाटली नाही. इतरांबरोबर कसे बोलायचे, वागायचे आणि एकूणच जनरल नॉलेज मला पतीने दिल्याचे रासकर सांगतात. त्यांच्या या शिकवणुकीमुळेच कोणतीही अडचण आली तर मला सहकारी मदत करतात, असे रासकर म्हणाल्या.
सन २००१ मध्ये मला रिक्षा चालवायचा परवाना मिळाला. त्या आधीपासूनच मी रिक्षा चालवत होते. पतीने रिक्षा चालवूनच बहिणीचे शिक्षण केले. ती एमएससी बीएड झाली, दीर एमएस्सी इलेक्ट्रॉनिक्स आणि पीएचडी पण झाला. भावंडांना एवढे शिकवले तर मुलांनाही का नाही शिकवणार, अशी पतीची जिद्द होती त्यामुळेच त्यांनी आमच्या तिन्ही मुलांना कॉन्व्हेंट शाळेत टाकले. मोठी मुलगी डॉक्टर झाली. ती सध्या इंग्लंडमध्ये असते. तर आणखी एक मुलगी पदवीधर होऊन विमाननगरमध्ये डब्ल्यू एन एस मध्ये काम करते आणि मुलगा सीए फर्ममध्ये इन्कमटॅक्ससंबंधी प्रकरणे हाताळतो, असे रासकर यांनी सांगितले.
असा आहे दिनक्रम
सकाळी पाच वाजून ४० मिनिटांनी रिक्षाचे मीटर टाकले की, आठ वाजता घरी येते. स्वयंपाक बनवते, त्यानंतर दुपारी साडेतीन ते साडेसहा शालेय मुलांना घरी सोडणे हे काम असते. त्यानंतर शिकवणीच्या मुलांनाही घरी सोडून आठ वाजण्याच्या सुमाराला सीएनजी भरण्याच्या लाइनला लागते आणि त्यानंतर घरी येते. घरकामाला कोणीही कामगार लावले नसून, आपण आणि मुले मिळूनच हे करतो, असे रुटीन त्या सांगतात. आज त्यांचे वय ४७ आहे. याही वयात त्या तेवढ्याच उत्साहाने काम करतात. वैशाली रासकर यांच्या रुपातील स्त्रीशक्तीला दै. प्रभातचा सलाम!