सातारा – मुख्यमंत्र्यांनीच चार महिन्यांमध्ये जिहे-कठापूर योजनेद्वारे संबंधित गावांना पाणी उपलब्ध करा असे सांगितले आहे. हे उपलब्ध पाणी रामोशीवाडीसह एकूण 47 गावांना पोहोचवण्यासाठी 210 कोटीचे टेंडर काढण्यात आले असून खरोटे आणि कंपनीला त्याची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. कूपनलिकेतून या गावांना पाणी मिळणार आहे. मला चुकीचे राजकारण करून या लोकांना त्रास द्यायचा नाही असे सांगत आ. महेश शिंदे यांनी आ. शशिकांत शिंदे करत असलेले सर्व आरोप खोटे असल्याचे ठामपणे सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. जिहे-कठापूर योजनेचा व्हॉल्व्ह बंद करण्यावरुन आ. शशिकांत शिंदे यांच्या आरोपांना आ. महेश शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
महेश शिंदे पुढे म्हणाले, आ.महेश शिंदे पोलिसांवर आणि प्रशासनाव दबाव टाकत आहेत. दिवसा कामे करणारे अधिकारी रात्री चोरासारखी का कामे करत आहेत, असा सवाल माजी आमदार करत आहेत. मात्र, मी जनतेला फसवत नाही सत्य आहे. विरोधकांचे राजकारण त्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणापुरते मर्यादित होते. त्यांच्या नेत्यांच्या कुटुंबासाठी ते फायदेशीर होते. आज मी त्यांचे अर्थकारण व त्यांच्या सगळ्या चोऱ्या थांबवल्या आहेत. त्यामुळे त्यांना वाटते की मी सूडाचे राजकारण करतोय. मात्र, जनतेच्या हितासाठी जे करावे लागेल ते करणार आहे. त्यांना काय वाटायचे ते वाटू दे.
रामोशीवाडीच नव्हे तर सगळाच भाग कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील सर्व गावे दुष्काळमुक्त करणार आहे. दहा वर्षे तुम्ही या मतदार संघाचे नेतृत्व केले. तेव्हा हा भाग पाणीदार करण्यासाठी कोणीही तुमचे हात बांधले नव्हते. उरमोडी योजनेचे पाणी कोरेगाव व खटाव तालुक्यासाठी होते. ते एक टीएमसी पाणी तुम्ही सांगली जिल्ह्याला देण्याचे पाप केले. तुम्ही जलसंपदा मंत्री होता. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की टंचाईग्रस्त भागात टॅंकर चालू आहे. तुमचे अपयश तुम्ही जनतेच्या माथी मारताय मी आता आमदार झालोय, असा टोला महेश शिंदे यांनी लगावला.
खटाव तालुक्यातील दुष्काळ संपवलाय आता भाडळे खोऱ्यातील दुष्काळ संपवणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला ठाम पाठिंबा आहे. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. मतदारसंघात कामे आम्ही करत असून त्याचे दृश्य परिणाम तुम्हाला लवकरच दिसतील. मतदारसंघाच्या विकासावर कधीही कुठल्याही व्यासपीठावर जाहीररित्या समोरासमोर चर्चा करायला तयार आहोत, असे खुले आव्हान महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिले.