येरवडा, दि.12 (प्रतिनिधी) -राज्य शासनाने मान्यता दिल्यास पुणे महापालिकेच्या वतीने येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारातील भौतिक सोयीसुविधा व उपाय योजनांसाठी संयुक्त प्रकल्प राबविण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधांसाठी पालिकेच्या वतीने योग्य ती मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, भाजपचे प्रवक्ते मंगेश गोळे, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. लता पांढरे, कार्यक्रमाचे संयोजक गणेश बाबर यांच्यासह रिज़वाना शेख, शशिकांत कुलकर्णी, किसन बाबर, महमूद खान, सागर कांबळे, हुसैन तांबोळी, मुश्ताक शेख, जगन ठोंबरे, कृष्णा सदभैया, प्रिती भट्टी, श्वेता पवार आदी उपस्थित होते.