पुणे- पुणे महापालिका निवडणुकीसाठी तीनची प्रभाग रचना होणार असल्याचा निर्णय अंतिम झाला असून महापालिकेकडून प्रभाग रचनेचे काम सुरू करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे पुण्यात एकूण 55 प्रभाग होणार असून एकूण 166 नगरसेवक असणार आहेत. त्यात, 50 टक्के महिला आरक्षण असल्याने एकूण 83 जागा महिलांसाठी असणार आहेत. परिणामी, सुमारे 55 मधील 28 प्रभागांमध्ये तीन पैकी दोन महिला एक पुरूष असणार आहे तर एका प्रभागात दोन महिला दोन पुरूष आणि 26 प्रभागांमध्ये 2 पुरूष एक महिला उमेदवार असणार आहे.
त्यामुळे प्रभाग रचना आणि प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांना महिला आरक्षणाचा झटका बसणार आहे. ही संभाव्य स्थिती एसी,एसटी आणि ओबीसी आरक्षणासह असणार आहे.
सध्या, महापालिकेत 164 नगरसेवक (स्विकृतसह) असून 39 प्रभाग हे चार नगरसेवकांचे आहेत व 2 प्रभाग 3 नगरसेवकांचे आहेत. तसेच, सामाविष्ट 11 गावांसाठी 2 नगरसेवकांचा 1 प्रभाग आहे. तर, “एससी’ आणि “एसटी’ यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणातच टाकावे लागते, त्यानुसार 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीत हे प्रमाण 13.5 टक्के हे “एससी’ आणि “एसटी’ होते तर 1.2 टक्के हे “एससी’ व “एसटी’ प्रवर्गासाठी होते, तर 27 टक्के आरक्षण हे ओबीसीसाठी होते म्हणजे एकूण आरक्षणाचे प्रमाण 41.7 टक्के होते. ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश शासनाने काढला असला तरी, त्याची अंमलबजावणी होईल की नाही याबाबत शास्वती नाही.
आगामी प्रभाग रचनेचा विचार करता; 50 टक्के महिला आरक्षणानुसार, एकूण 83 महिला उमेदवारांना संधी द्यावी लागले. त्यात, पुण्यात 55 प्रभाग होणार असून 54 प्रभाग तीनचे तर 55 क्रमांकाचा प्रभाग चार चा असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा 55 प्रभागांसाठी महिला आरक्षण टाकले जाईल. त्यानंतर उर्वरीत 28 महिला आरक्षण पुन्हा 55 मधील 28 प्रभागात असेल त्यामुळे 28 प्रभागात प्रत्येकी दोन महिला असतील. तर 26 प्रभागात दोन पुरूष आणि एक महिला असेल तर शेवटच्या प्रभागात दोन पुरूष आणि दोन महिला असतील.
विद्यमानांची अडचण…
शहरातील जवळपास 28 प्रभागांमध्ये 2 महिला उमेदवार येणार असल्याने अनेक विद्यमान पुरूष नगरसेवकांना घरातील महिला उमेदवारांसाठीही तयारी ठेवावी लागणार आहे. तीनचा प्रभाग असल्याने ही स्थिती उद्भवली आहे. दोनचा अथवा चारचा प्रभाग असल्यास दोन पुरूष दोन महिला असे आरक्षण सोपे जाते. मात्र, तीनच्या प्रभागामुळे अनेक विद्यमानांना घरातील महिलेला तिकिट द्यावे लागणार आहे. त्यामुळे, गेली चार वर्षे स्वत:साठी तयारी करणाऱ्या अनेक विद्यमान, इच्छूकांना घरकारभारणीची कागदपत्रे तसेच निवडणूकीसाठी आपल्या घरातील महिला उमेदवाराचे नाव मतदारांपर्यंत पोहचविताना अनेक चांगल्याच अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
जागा वाटपात चढाओढ… महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून महाविकास आघाडीचा निर्णय होणार असल्याचे तीनही पक्षांनी जाहीर केले आहे. तसे, झालेच तर तीनचा प्रभाग असल्याने जागा वाटपातही चढाओढ राहणार, हे निश्चित आहे.