पुणे – सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम आठ दिवसांत जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोग कामाला लागले आहे. राज्यातील जवळपास 14 महापालिका 25 जिल्हा परिषदांसह अनेक नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या एकत्रित निवडणूक आल्याने निवडणूक आयोगावर तसेच ासकीय यंत्रणेवर ताण पडू शकतो. त्यामुळे किमान महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम दोन टप्प्यांत होण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगावर निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा प्रचंड ताण येणार आहे. निवडणूक यंत्रणेसाठी आवश्यक असलेले घटक उपलब्ध होण्यातही अडचणी येणार आहेत, त्यातच पावसाळ्यातच निवडणुका घ्याव्या लागत असल्याने यंत्रणे समोर मोठ्या अडचणी असणार आहेत. स्थानिक स्वराज संस्थांच्या अन्य निवडणुका लक्षात घेता किमान महानगरपालिकेच्या निवडणुका तरी दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ज्या महापालिकांना सहा महिने किंवा एक वर्ष झाले आहे, त्यांची निवडणूक घेतली जाईल. तर, नुकतीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे, असे झालेच तर पुणे महापालिकेची निवडणूक दुसऱ्या टप्यात होऊ शकते. या महापालिकेच्या निवडणूका दोन टप्प्यांत होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.