पुणे – करोनातून बरे झालेल्या गंभीर रुग्णांना म्युकरमायकोसीसचा धोका निर्माण झाला आहे. पण, अनेकांना त्याची लक्षण त्वरित लक्षात येत नसल्याने उपचारास उशीर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन दि. 1 एप्रिलनंतर करोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांना लक्षणे आहेत की नाही याची तपासणी महापालिका प्रशासनाकडून केली जाणार आहे. या शिवाय, प्रशासनाकडून या रुग्णांना फोन करून त्यांना या आजाराबाबत काही लक्षणे आहेत का याचीही माहिती घेतली जात आहे.
म्युकरमायोसीसच्या रुग्णांवर वेळीच उपचार सुरू व्हावेत यासाठी महापालिकाच आता रुग्णांना शोधणार आहे. एक एप्रिलनंतर ज्यांना करोना झाला आहे व ज्यांची प्रकृती गंभीर होती, ज्या रुग्णांना मदुमेहाचा त्रास आहे, अशांना फोन केले जाणार आहेत. त्यांच्यासाठी प्रश्नावली तयार केली जात आहे.
शहरातील गंभीर रुग्नांची माहिती महापालिका प्रशासनाकडे असून या माहितीच्या आधारे रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना काही लक्षणे आहेत का हे शोधण्यासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. जर लक्षणे आढळून आली तर त्यांना तपासणीसाठी कमला नेहरू रुग्णालयात बोलावून कान, नाक, घसा व नेत्र तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाईल. जर लक्षणे असतील या रुग्णांवर दळवी रुग्णालयात उपचार सुरू केले जाणार आहेत.