पुणे – देशभरातील मालवाहतूकदार संघटनेकडून आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, पेट्रोल पंपही बंद राहणार असल्याचा गैरसमज सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरला. त्यामुळे रात्रीत शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी झाली होती. दरम्यान डिलर असोसिएशनकडून पेट्रोल, डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, दिवसभरात मागणी वाढल्यामुळे बहुतांश पंपावरील पेट्रोल, डिझेल साठा संपला आणि मंगळवारी (दि. 2) बहुतांश पंपाबाहेर पेट्रोल संपल्याचे बोर्ड लागले आहेत.
मालवाहतूक करणाऱ्या चालकांकडून अपघात झाल्यास दहा वर्षे कारावास आणि जबर दंडाच्या शिक्षेची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. आता हे विधेयक राज्यसभेत ठेवले जाणार आहे. मात्र, या विधेयकाला देशभरातील मालवाहतूकदार संघटनांनी तीव्र विरोध करत संप पुकारला आहे. या संपामुळे शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद राहणार, असे संदेश सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरू लागले. त्यावर आॅल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनने तत्काळ खुलासा केला.
मालवाहतूकदारांचा संप जरी असला तरी पुणे शहरातील सगळे पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. पुरवठाही सुरळीत सुरू राहील, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. मात्र, तरीही पुणे शहर आणि उपनगरातील पेट्रोल पंपांवर दुचाकी, चारचाकी वाहनचालकांनी रांगा लावून पेट्रोल भरुन घेतले. त्यामुळे शहरतील काही पेट्रोल पंपांकडे असलेल्या नियमित साठ्यापेक्षा जास्त मागणी वाढल्याने तेथील पेट्रोल संपले. त्यामुळे पेट्रोल संपल्याचे काही ठिकाणी बोर्ड झळकले.
सर्वच पंपांवर पेट्रोलचा नियमित पुरवठा
लोणी काळभोर येथील कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. त्यामुळे लोणी काळभोर येथून शहर आणि जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर टँकरद्वारे पेट्रोलचा पुरवठा केला जात आहे, असे आॅल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनने जाहीर केले आहे. त्यामुळे सगळीकडे पेट्रोलचा पुरवठा केला जात आहे. परंतु, वाहनचालकांच्या पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याने काही पंपांवर पेट्रोल संपले आहे.