पिंपरी – लोणावळा ते पुणे दरम्यान आता दुपारच्या वेळेतही लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारपासून (दि. १५) दुपारच्या वेळेत सोईनुसार लोकल धावणार आहे. याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. दुपारच्या वेळेत लोकल आता पुन्हा सुरू होणार असल्याने प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांची सोय होणार आहे.
कोरोना साथ सुरू होण्यापूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान लोकल गाड्यांचे संचालन व्यवस्थित सुरु होते. कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवा बंद करण्यात आली. कोरोनानंतर आता देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरु झाल्या आहेत. कोरोना साथीच्या अगोदर पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल गाड्या चालवल्या जात होत्या.
कोरोना काळात त्या बंद करण्यात आल्या. त्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. साडे दहा ते अडीच या वेळेत लोकल सेवा बंद होती. त्यामुळे या दरम्यानच्या काळात प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी यांना प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत होता. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय होत होता. त्यामुळे दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी वारंवार केली होती. अखेर त्यास यश आले आहे. आता सोमवारपासून दुपारच्या वेळेत आता पुन्हा लोकल सुरू होणार आहेत.
अशी असेल वेळ
शिवाजीनगर स्थानकावरून दुपारी १२.५ वाजता लोकल सुटेल. ती १२.४५ वाजता लोणावळा स्थानकात पोहोचले.
लोणावळा स्थानकावरून सकाळी ११.२० वाजता लोकल सुटेल ती १.२० वाजता शिवाजीनगर येथे पोहोचेल.