हिंजवडी – हिंजवडी आयटीनगरीचे सुपुत्र जीवन युवराज साखरे यांची भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. तसेच पुरंदर तालुक्यातील सासवड मंडल सहप्रभारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबाबतचे निवडीचे पत्र भाजप पुणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिले आहे.
यापूर्वी जीवन साखरे यांनी पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी उत्तमरीत्या काम केले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर आता पुणे जिल्ह्याच्या संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्वास उंचावला असून महाराष्ट्रातील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने संघटनात्मक बांधणीवर मोठा भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यामध्ये मुळशी तालुक्यातील हिंजवडी माण या पूर्व भागातील तरुणांना जिल्ह्यावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे .
जीवन साखरे यांना कुठलाही राजकिय वारसा नसताना त्यांच्यातील संघटन कौशल्य व दांडगा जनसंपर्क पाहून पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघात हिंजवडी माण सारख्या मोठमोठ्या गावामध्ये पक्षसंघटना भक्कम करण्याची मोहीम हाती घेतली आहे.