राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे सूचक विधान
“मनसे’च्या जयश्री मारणे “राष्ट्रवादी’त
कोथरूड – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांवर तसेच पक्षावर निष्ठा कायम असलेल्या मनसेच्या जयश्री मारणे या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवारात दाखल झाल्या आहेत. येत्या काळात शहरातील अनेक दिग्गज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आल्याचे दिसतील, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे शहाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांचा जाहीर पक्ष प्रवेश शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत झाला. शहराध्यक्ष जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ते बोलत होते. मारणे यांच्या येण्याने पक्षाला तसेच ज्या प्रभागातून त्या इच्छुक आहेत तेथे राष्ट्रवादीला बळकटी मिळाली असल्याचे मतही जगताप यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी उपमहापौर व नगरसेवक दीपक मानकर, नगरसेवक बाबूराव चांदेरे, नगरसेवक सुभाष जगताप, माजी नगरसेवक शंकर केमसे, रूपाली ठोंबरे, अभय मांढरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयश्री मारणे कोणत्या प्रभागातून निवडणूक लढविणार हे प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू झाल्यावरच समजेल.
मात्र, शास्त्रीनगर, सागर कॉलनी, सुतारदरा या वस्ती भागासह प्रभाग 32 मध्ये मारणे यांची व्होट बॅंक चांगली आहे, त्याचा फायदा पक्षासह पॅनलमधील उमेदवारांनाही होऊ शकतो, अशी चर्चा मारणे यांच्या पक्ष प्रवेशानंतर सुरू झाली आहे.