पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीतील वसतिगृहे पीएच.डी व स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून (दि. 21 फेब्रुवारी) सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर विद्यापीठातील इतर वसतिगृहेदेखील 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात येत असल्याचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.
करोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही विद्यापीठातील वसतिगृहे सुरू झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. काही विद्यार्थी संघटनांनी याबाबत कुलगुरूंना निवेदन देऊन वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने वसतिगृह सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठाला केल्या होत्या. पीएच.डी तसेच स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र खोल्या असल्याने या विद्यार्थ्यांसाठी 21 फेब्रुवारीपासून वसतिगृहे सुरू करण्यात येत असल्याचे परिपत्रक विद्यापीठाने शुक्रवारी प्रसिद्ध केले.
वसतिगृहात प्रत्यक्ष राहण्यास येण्याअगोदर विद्यार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. तसेच करोना व्यवस्थापनाचे राष्ट्रीय निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानक कार्यप्रणाली (एसओपी), विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना तसेच पुणे मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुुचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.