पद्मावती कार्यालयात नागरिकांचे आंदोलन
सहकारनगर – पद्मावती महावितरण कार्यालयातील वीज बिलांचा गोंधळ कायम असून वाढीव बिल आणि बिलातील चुका दुरुस्तीसाठी महावितरणाकडे ग्राहकांच्या चकरा वाढल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात एकत्रित बिले पाठवून अगोदरच “शॉक’ दिलेल्या महावितरण कार्यालयाने पुन्हा एकदा वाढीव बिले पाठविल्याने नागरिकांनी आंदोलन केले.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. झोपडपट्टी, वस्ती, वसाहतीत राहणारे नागरिक मोलमजुरी, धुणीभांडी करून आपले पोट भरतात. करोनाच्या संकटामुळे हाताला काम नाही. घरगाडा कसा चालवावा, हा मोठा प्रश्न उभा आहे आणि त्यात भर म्हणून महावितरणकडून मोठमोठ्या रकमेची वीज बिले पाठविण्यात आली आहेत.
चव्हाणनगर, संभाजीनगर, शंकर महाराज वसाहत, राजीव गांधीनगर, तळजाई वसाहत, पांचाळ वस्ती, आंबेडकर वस्ती, गवळीवाडा, जय मल्हार वस्ती, टांगेवली कॉलनी, शाहू वसाहत, दाते बसथांबा, शिवदर्शन, मोगल वसाहत, मोरे वस्ती या भागातील नागरिकांनी मोठ्या रकमेची वीज बिले आली आहेत. यामुळे या भागातील नागरिकांनी पद्मावती महावितरण कार्यालयात जाऊन तक्रार करत आंदोलन केले.
यावेळी नगरसेवक महेश वाबळे यांनी आधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करावे, वेळेत व अचूक रीडिंग घेऊन बिले द्यावीत, बिलांवर चक्रवाढ व्याज लावू नये, नागरिक योग्य बिल भरण्यास तयार आहेत; परंतु त्यांना बिलाची रक्कम पुढील तीन महिन्यांत हप्त्यात भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी केली.