पुणे- ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे व डेक्कन् स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित लिगसी रन मॅरेथॉन उत्साहात पार पडली. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीच्या रौप्य महोत्सवानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला. शिवाजीनगर भागात भरवलेलल्या या मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रभरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग दर्शवला.
ए.आय.एस.एस.एम.एस. महाविद्यालय परिसरापासून मॅरेथॅानची सुरुवात झाली. स्पर्धेत ५ कि.मी.साठी ‘ए.आय.एस.एस.एम.एस. कॅालेज ते बंड गार्डन’ या मार्गाने धावपटूंनी धाव घेतली. लिगसी रन पुणे मॅरेथॉन स्पर्धा १४ ते ३० वय वर्ष, ३१ ते ४० वय वर्ष तसेच ४१ ते ५० वय वर्ष व ५१ वर्षांपुढील या चार वयोगटात संपन्न झाली.
एकूण ५० स्वयंसेवक मॅरेथॉन मार्गावर कार्यरत होते. नागरिकांचे आरोग्य सुदृढ व्हावे व एकोपा तयार व्हावा यासाठी केलेली मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पडली, याचा मनस्वी आनंद आहे, असे मत ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे संचालक समीर चौगुले, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने, सुरज खटावकर, आर.जे चेतना शाशा शेळके, दिपाली मोरे आदी उपस्थित होते.