पुणे – क्रीडाच्या वाढीव गुणांसाठी सुधारित नियमावली

क्रीडा संचालनालयाचा निर्णय : संघटनांची यादीही जाहीर

पुणे – राज्यातील इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत सुधारित नियमावली तयार करण्यात आली असून यापुढे त्याप्रमाणेच अंमलबजावणी करावी लागणार आहे.

शासन निर्णयाद्वारे शालेय व इतर क्रीडा स्पर्धा, केंद्र शासनाचा क्रीडा विभाग पुरस्कृत स्पर्धा, एकविध खेळ संघटनेद्वारा आयोजित राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी व प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या क्रीडा गुणांच्या सवलतीबाबतची तरतूद नमूद करण्यात आली आहे. 49 खेळ प्रकारांच्या एकविध खेळ राज्य संघटनांना क्रीडागुणांसाठीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत क्रीडा संचालनालयाद्वारे सूचित केले होते. यात एकूण 23 खेळांच्या एकविध राज्य संघटनांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून यापैकी 13 खेळांच्या एकविध राज्य संघटना शासन निर्णयानुसार पात्र ठरल्या आहेत. उर्वरित 10 खेळांच्या एकविध संघटनांना त्रुटींची पूर्तता करण्यास सांगितले आहे. ज्या एकविध खेळ संघटनांनी अद्यापही प्रस्ताव सादर केलेले नाहीत, अशा राज्य संघटनांनाही प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

क्रीडा गुण मिळविण्यासाठी नियमानुसार पात्र गुणांच्या शिफारशीचे प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाना दिलेल्या मुदतीत सादर करावेत. खेळाडूंची यादी 20 मेपर्यंत क्रीडा संचालनालयास सादर करावी, अशा सूचना क्रीडा व युवक सेवा विभागाच्या सहसंचालकांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पात्र संघटनांची नावे
महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स असोसिएशन, महाराष्ट्र अमॅच्युअर बॉक्‍सींग असोसिएशन, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र स्टेट फेसींग असोसिएशन, द वेस्टर्न इंडीया फुटबॉल असोसिएशन, महाराष्ट्र ज्युडो असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस असोसिएशन, ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन, महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशन, महाराष्ट्र टेनिक्काईट असोसिएशन, महाराष्ट्र अमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट सॉफ्टबॉल असोसिएशन, ऑल मराठी चेस असोसिएशन या 13 एकविध खेळांच्या राज्य संघटना पात्र ठरल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.