निवडणूक प्रचार आता अखेरच्या टप्प्यात

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील निवडणूक वातावरण तापले

नगर – नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. कडक उन्हाचा अडथळा असला तरी अखेरच्या टप्प्यात निवडणूक चांगलीच रंगतदार वळणावर पोहोचली आहे. अगदी एक-दीड महिन्यांपूर्वी निकालाबद्दल अगदी ठामपणे बोलणारेही आता नेमके काय होईल ते सांगता येत नाही’, असे म्हणू लागले आहेत. याचे कारण गेल्या पंधरा दिवसांत उमेदवारांच्या प्रचाराने अनेक वळणे घेतली आहेत.

राष्ट्रीय व राज्यपातळीवरील प्रचारसभांचे आणि राजकीय घडामोडींचेही काही परिणाम शक्‍य आहेत. त्यामुळे मतदारसंघातील निवडणूक कुणालाच सोपी नाही.ती चुरशीची होणार आहे’, एवढा तरी सार्वत्रिक निष्कर्ष मात्र निघतो आहे. प्रचार काळात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी झाल्या. त्यामुळे कोण कुठल्या पक्षात आहे. कोण कुणाचे खरोखरच काम करतो आहे, की काम केल्याचे दाखवतो आहे, त्याचा नेमका अंदाज अजूनही लागलेला नाही. अनेकांची व्यासपीठावरची पाठिंब्याची भाषा आणि प्रत्यक्षात ग्राऊंड लेव्हलवरची भूमिका यामध्ये तफावत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव असल्याने निवडणुकीकडे तटस्थ दृष्टीने पाहणाऱ्यांना खात्रीचा निष्कर्ष काढता येणे कठीण असल्याचे जाणवते आहे.
पूर्वी निवडणूक म्हणले, की सभा, प्रचार, गाठीभेठी, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक मार्गांचा वापर करून प्रचाराचे मैदान तापवले जायचे. पण यंदाच्या निवडणुकीत त्या तुलनेत प्रचाराचे मैदान काही तापले आहे असे दिसून आले नाही. उन्हाच्या तडाख्याने वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.

राजकीय वातावरण मात्र तुलनेत शांत आहे. उमेदवार गावागावात आले की प्रचाराची यंत्रणा हलल्यासारखी वाटते. गर्दी जमते. एकदा सभा किंवा बैठक संपली, की पुन्हा तिथे शुकशुकाट असतो. निवडणूक आहे असे काही जाणवत नाही. कडक उन्हामुळेही प्रचारसभा आणि बैठकांवर मर्यादा आल्या आहेत. भर दुपारी सभा असेल तर गर्दी जमेल का, याबद्दल सगळेच साशंक असतात. विकासकामांचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत हमखास असतो. गेली अनेक वर्षे हा मुद्दा प्रत्येक पक्ष, आघाडी, युती किंवा उमेदवार मांडत असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे विषयही मांडले जातात. तसेच दुष्काळग्रस्त भागातील पाणी योजना, शेतीमालाचा दर, साखर कारखानदारीची स्थिती, शेतकऱ्यांची परिस्थिती, आपल्या बाजूची कर्तबगारी आणि विरोधी उमेदवारांची निष्क्रीयता असे मुद्देही प्रचारात कायम आहेत. तुलनेने स्थानिक पातळीवरचे प्रश्‍न मात्र फारसे मांडले गेल्याचे दिसले नाही. तत्त्वनिष्ठा, पक्षनिष्ठा, लोकांबद्दलचा कळवळा असे मुद्देही प्रचारात आले.

उमेदवार किंवा त्यांचे प्रचारक विरोधात लढणाऱ्यांकडे हे मुद्दे नसल्याचे ठासून सांगत होते. तसेच एकदा संधी द्या, मतदारसंघाचे चित्र पालटून दाखवतो. विकास कसा असतो ते दाखवून देतो’, असेही सर्वच उमेदवार आणि त्यांचे प्रचारक ठामपणे सांगत आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरसेवक, आमदार, पक्षांचे पदाधिकारी असे सर्वच जण प्रचार बैठका आणि सभा यामध्ये भाग घेताना दिसत आहेत. त्यांच्यावर त्या-त्या गावातली किंवा भागातली जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

त्याचवेळी पक्षांतर्गत विरोधी गटाच्या लोकांवर लक्ष ठेवण्याचीही व्यवस्था काही ठिकाणी करण्यात आली आहे. आघाडी आणि युतीच्या वरिष्ठांकडून प्रत्येक नेता व कार्यकर्त्यांना आपापले गड सांभाळण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्येकजण पूर्वीचे अनुभव आणि भविष्यातील आपली राजकीय तरतूद यांचा विचार करूनच प्रचारात सहभागी झाला आहे, असे जाणवते. निष्ठा वगैरे शब्द प्रचारात वारंवार येत असले तरी जो तो आपल्या हिशेबानेच प्रचार करताना दिसतो आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.