पुणे – पत्नीला मारहाण करून छळ करणाऱ्या पतीला न्यायालयाने (Pune Court) दणका दिला आहे. पतीपासून संरक्षण मिळावे यासाठी पत्नीने दाखल केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वि. पी. खंदारे यांनी मंजूर केला असून, पतीने पत्नीशी संपर्क साधू नये, तसेच तिच्या घरात प्रवेश करू नये, असा आदेश पतीला दिला आहे.
हिंसाचारापासून संरक्षणासाठी न्यायालयात अर्ज –
रोमा आणि रोम (दोघांची नावे बदलेली आहेत) हे पती-पत्नी आहेत. पतीद्वारे तिचा वारंवार छळ होत होता. शिवीगाळ, मारहाण, चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास दिला जात होता. त्यामुळे तिने ऍड. पुष्कर पाटील व ऍड. प्रणव मते यांच्यामार्फत घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
पुरावे देऊन केली मागणी –
दरम्यान, मुख्य तक्रारीच्या सुनावणीपुर्वी अंतरिम अर्जाद्वारे पतीपासून तातडीने संरक्षण मिळावे, अशी मागणी पत्नीतर्फे करण्यात आली होती. यावेळी युक्तीवाद करताना पत्नीचे वकील ऍड. पुष्कर पाटील, ऍड. प्रणव मते यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्यांचे दाखले देत, आवश्यक पुरावे देऊन पतीला पत्नीच्या घरात प्रवेश करण्यापासून मज्जाव करावा, अशी मागणी केली.
पत्नीच्या घरात प्रवेश न करण्याचा आदेश –
विरोधी पक्षाला आणि वकिलांना संधी देऊन देखील त्यांनी त्यांचे म्हणणे न मांडल्याने त्यांचे म्हणणे न ऐकता अंतरिम आदेश करण्याची मागणी पत्नीच्या वकिलांनी केली. पत्नीच्या वकीलांचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने पत्नीचा हिंसाचार करू नये, तसेच पत्नीशी संपर्क साधू नये आणि तिच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, असा आदेश पतीला दिला आहे.