पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा समाचार घेतला आहे. “काही जण कारण नसताना मला ट्रोल करत आहे. मी नेमके काय बोललो, अन् कुठे बोललो, हे पाहा’. सध्या राज्यातील विविध विभागात दीड लाखांपेक्षा जास्त भरती सुरु आहे. परंतु आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि सोशल मीडियावर बातम्या ते पोहचवतात. मात्र, सत्य परिस्थिती पाहत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
विविध विभागांचा मी आढावा घेत असताना अनेक ठिकाणी कर्मचारी कमी असल्याचे दिसले. काही ठिकाणी ताबडतोब कर्मचारी लागतात. शिक्षक, डॉक्टर, पोलीस असे काही विभाग आहेत. नवीन शिक्षकांची भरती होईपर्यंत निवृत्त झालेल्यांना तात्पुरते घेतले. तशीच पोलीस किंवा इतर विभागात भरती करताना काही काळ लागतो. तो काळ कंत्राटी भरतीमाध्यमातून (Recruitment of contract employees) काढावा लागतो, असेही म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले.
रोहित पवार काय म्हणाले होते ?
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवार यांचे नाव न घेता रोहित पवार म्हणाले होते की, एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील, असे वक्तव्य राज्यातील एका बड्या नेत्याने केले. त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटत आहे. त्यांनी हे सूत्र एका आमदार, खासदारावर लावले तर करोडो रुपयांची बचत होईल आणि त्यात अनेक शासकीय कर्मचारी काम करतील, असे ट्विट रोहित पवार यांनी केले होते. अजित पवार शुक्रवारी (दि.15) खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी असे ते म्हणाले.
तो जीआर मागील सरकारचा
कंत्राटी भरतीचा तो जीआर मागच्या काळातील सरकारचा आहे. त्यावर कोणाच्या सह्या आहेत, हे मी दाखवू शकतो. परंतु विरोधक विरोधासाठी विरोध करत आहेत. मी बोलताना एक बोललो. कारण नसताना गैरसमज करु नका, असे अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावले.