पुणे – हुंडा म्हणून ठरलेले पाच तोळे सोने न दिल्यामुळे पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत पेट्रोलने जाळून घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणात अटक केलेल्या पतीला सत्र न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांनी जामीन मंजुर केला आहे.
सिध्देश्वर बाळकृष्ण निकम (वय 28, रा. कुसगाव बुद्रुक, ता. मावळ, मूळ. खानापूर, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. शिवप्रसाद साळुंके यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. पत्नीने मृत्यूपूर्वी भावासमोर जबाब दिला. त्यामध्ये अपघाताने ती जळाली आहे. तिचा कोणावरही आरोप नाही, असे सांगितले आहे.
सिध्देश्वर याने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याचे दोन्ही हात आणि पाय भाजले आहेत. त्यांनी 14 एप्रिल रोजी पेटवून घेतले. मात्र एफआयआर 26 एप्रिल रोजी विलंबाने दाखल करण्यात आली आहे. त्याला या गुन्ह्यात गुंतविल्याचा युक्तीवाद ऍड. शिवप्रसाद साळुंके यांनी केला. पत्नी स्वातीचे वडील सर्जेराव पवार, ( वाटंबरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
ही घटना कुसगाव येथील सिंहगड स्टॉफ क्वॉर्टर वैष्णवी क्रमांक 2 इमारतीमध्ये घडली. 14 एप्रिल रोजी पेटवून घेतलेल्या स्वाती यांचा 25 एप्रिलला मृत्यू झाला. हुंड्याचे सोने, माहेरहून गाडी, वस्तु आणि पैसे आणण्यासाठी सिध्देश्वर त्यांना त्रास देत असत. त्यामुळे स्वाती यांनी हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर शनिवारी आणि तपास अधिकारी बोलावतील त्यावेळी संबंधीत पोलीस स्टेशनला हजर राहणे, या आणि विविध अटींवर हा निकाल देण्यात आला आहे.