वॉशिंग्टन – जगभरात थैमान घालणाऱ्या करोना संसर्गाने अमेरिकेला काही दिवस दिलासा दिला होता. रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि लसीकरण झाल्यामुळे अमेरिकेत करोना निर्बंध शिथील कऱण्यात आले होते. मात्र आता अमेरिकेची चिंता वाढली असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
अमेरिकेत एका महिन्यात रुग्णांच्या संख्येत 5 पटीने वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्यात दररोज एक लाखाहून अधिक रुग्ण वाढत आहेत. नव्या डेल्टा वेरिएंटमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं बोललं जात आहे. फ्लोरिडा, टेक्सास, मिसौरी, अर्कासस, लुसियाना, अलबामा आणि मिसिसिपीमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण अधिक आहे.
अमेरिकेत आतापर्यंत ५० टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतली आहेत. मात्र ज्या भागात करोना लसीकरण अधिक प्रमाणात झालेले नाही, तिथे करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत पहिल्यांदा नोव्हेंबर 2020 मध्ये 100,000 हून अधिक रुग्णांची वाढ झाली होती. जानेवारीमध्ये ही संख्या 2,50,000 वर पोहचली होती.
अमेरिकेत 2 ऑगस्टला 1 लाख 36 हजार, ३ ऑगस्टला 1 लाख 50 हजार, 4 ऑगस्टला 1 लाख 12 हजार, 5 ऑगस्टला 1 लाख 27 हजार तर 6 ऑगस्ट रोजी 1 लाख 68 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.