पुणे – शहरात गुन्हेगारीसाठी कोयत्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सध्या तर साऊथ इंडियन चित्रपटातील स्टाईलचे कोयते गुन्हेगार वापरु लागले आहे. दहशत, खून, खूनाचा प्रयत्न आणी अगदी खंडणी मागण्यासाठीही कोयत्यांचा सर्रास वापर होत आहे. गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेले कोयते हस्तगत केले जातात. मात्र तरही गुन्हेगारांकडे तसेच अल्पवयीन गुन्हेगारांकडेही नव नव्या पध्दतीचे कोयते दिसत आहेत. हे कोयते बनवणाऱ्याकडे तसेच ते विकणाऱ्यांकडे आजवर पोलिसांचे दुर्लक्ष होत होते. मात्र दत्तवाडी पोलिसांनी एका गुन्हयात थेट कोयते बनवणाऱ्या लोहारावरच कारवाई केली आहे. यामुळे कोयते बनवून गुन्हेगारांना पुरवणाऱ्यांवर जरब बसण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात गुन्हेगार व युवक धारदार हत्यारांचा वापर करुन वाढदिवसांचे केक सार्वजनिक ठिकाणी धारदार हत्यारानी कापुन सर्व सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत. या अनुषांगाने दत्तवाडी पोलिसांचे तपास पथक झोपडपट्टया इतर वसाहतीमधील उपद्रवी तरुण व गुन्हेगार यांच्या व्हॉट्सअप व इतर सोशल मिडिया ग्रुपवर येणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांवर लक्ष ठेवत होते. त्यादरम्यान पोलीस अमंलदार विष्णु सुतार, शरद राऊत व राहुल ओलेकर यांना खबर मिळाली की, काही दिवसापूर्वी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करून त्यांचे फोटो व्हॉटसअप स्टेटस ला ठेवून दहशत निर्माण करणारे दोन तरुण हे जनता वसाहतीतील राममंदिराजवळ हातामध्ये हत्यारे घेवून थांबले आहेत. त्यानूसार रितेश वाळु पायके (19) आदित्य संजय नलावडे (19 , धंदा – काही नाही. दोघेही रा जनता वसाहत ) यांना हत्यारांसह पकडले.
त्यांना पोलिशी खाक्या दाखवता त्यांनी त्यांचेकडील तलवारीसारखे कोयते त्यांचे ओळखीच्या भोर मधील लोहार प्रेम योगेश पवार (24 धंदा – लोहार व्यवसाय , रा . नवीआळी झोपडपट्टी , भोर ) याचेकडुन घेतल्याचे सांगितल्याने. तसेच तो लोहार सद्या त्यांना अजुन हत्यारे देण्यासाठी जनता वसाहत परीसरात येणार असल्याची माहिती दिली.
त्यानुसार लागलीच कारवाई करुन पोलीसांनी हत्यारे बनविणाऱ्यास लोहारास सुध्दा अटक केली. त्यांचेविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करणेत आला असुन त्यांचेकडुन एकुण 7 प्राणघातक कोयते जप्त करण्यात आले आहेत. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रमोद खरात हे करीत आहेत.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस पोर्णिमा तावरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरिक्षक विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार , पोलीस हवालदार कुंदन शिंदे, राजू जाधव, पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, विष्णु सुतार, शरद राऊत, राहुल ओलेकर, भरत आस्मर, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले यांनी केली आहे.
गाडीच्या पाट्यापासून बनवले कोयते
दोघाही आरोपींचा एक मित्र भोर परिसरात रहायला आहे. त्याने आरोपींना तुम्हाला कोयते बनवून हवे असल्यास माझ्या ओळखीचा एक व्यक्ती आहे तो बनवून देईल अशी माहिती दिली होती. त्यानूसार आरोपींनी एका गॅरेजमधून गाडीचा पाटा विकत घेतला होता. तो लोहार प्रेम पवारला देऊन त्यापासून कोयते तयार करुन घेतले होते.