पुणे – जसजसा उन्हाचा पारा वाढतोय, तशी अंगाची लाहिलाही होत आहे. पुण्यात मागील दोन दिवसांपासून कमाल तापमानात दोन अंशाने वाढ झाल्यामुळे पारा ३८ अंशावर जावून पोहचला. तर, शहराच्या काही भागात कमाल तापमान ३९ अंशापर्यंत पोहचले आहे. दरम्यान, शहरात पुढील दोन दिवसांत एक ते दीड अंशाने कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
मागील आठवड्यात ३५ अंशाच्या खाली गेलेल्या कमाल तापमानात तीन ते चार अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा वाढत्या चटक्याने पुणेकर हैराण झाले. मुळात उन्हाळ्याची ही सुरवात आहे, अजून पारा ४०च्या पुढेही गेलेला नाही, तोच अंगाची लाहिलाही होऊ लागली आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असणार आहे.
दरम्यान, राज्यातही हवामान कोरडे असल्यामुळे कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. आज, माळेगाव येथे सर्वाधिक ४०.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर यवतमाळ, अकोला, सोलापूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यातील कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे.
शहरातील काही भागातील कमाल तापमान
लवळे – ३९, लोहगाव आणि मगरपट्टा – ३८, शिवाजीनगर – ३७.७, पाषाण – ३७.४