पुणे – लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांचा निवडणूक खर्च आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर करडी नजर ठेवली जात आहे. यासाठी जिल्ह्यात १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती तक्रार निवारण कक्षाद्वारे देण्यात आली आहे.
खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते.
भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडिओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी), व्हिडिओ पाहणी पथक (व्हीव्हीटी), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष आदीदेखील खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचीदेखील या कामात मदत घेतली जाते.
उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या सर्व जाहीर सभा, रॅली यांचे व्हिडिओ चित्रीकरण व्हीएसटीच्या माध्यमातून केले जाते व त्याची पाहणी व्हीव्हीटीकडून केली जाते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३ व्हीएसटी आणि २ व्हीव्हीटी नेमण्यात आल्या आहेत. या पथकाची निरीक्षणे खर्च पथकासाठी उपयुक्त ठरतात. एमसीएमसीद्वारे उमेदवारांच्या जाहिरात खर्चाचा अहवाल समितीकडे पाठविला जातो.
या विविध माध्यमातून उमेदवारांनी दर्शविलेला निवडणूक खर्चाची पडताळणी केली जाते. खर्च दर्शविण्यात आला नसल्यास त्याबाबतची नोटीस देऊन त्याच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जातो, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
पथकांचे कार्य काय?
या पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठीची रोकड, मद्य, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, सिव्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही आदी कामे करण्यात येतात.