वर्षभरात बोगस एनए ऑर्डर दाखवून 112 दस्त नोंदवले
गुन्हे दाखल करण्याच्या नोंदणी विभागाच्या सूचना
पुणे – दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 3 येथे दि. 5 ऑक्टोबर 2021 ते दि. 25 ऑक्टोबर 2022 या कालावधीत नोंदविलेल्या 1 हजार 472 दस्तांची तपासणी केली असता, सुमारे 10 टक्के म्हणजे 112 इतके दस्त बोगस एनए ऑर्डर, बोगस भोगवटाप्रमाणपत्राच्या आधारे नोंदविण्यात आल्याचे आढळले आहे. त्यामुळे बोगस कागदपत्रांच्या दस्त नोंदविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना नोंदणी विभागाने दिल्या आहेत.
पालिका, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन बांधकाम केले असेल, तसेच “रेरा’ क्रमांक असेल तरच दस्तनोंदणी करता येते. मागील दोन वर्षांपासून अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणीस बंदी आहे. यामुळे अनेक इमारतींमधील दस्तनोंदणी होत नाही. मात्र, बोगस कागदपत्रे सादर करून दस्तनोंदणी करण्याच्या प्रकार शहरात उघडकीस आला आहे.
बोगस एनए ऑर्डर बनवून त्या आधारे दस्तनोंदणी करण्यात येत होती. त्यासाठी अतिवरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या नावे वापरून “एनए ऑर्डर’ व भोगवटा प्रमाणपत्र बनविण्यात आले आहे. या दस्तांचे पडताळणी सुरू झाली.
याप्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 3 या कार्यालयाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, त्यामध्ये 112 दस्त अशाप्रकारे नोंदविण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रथमदर्शनी केलेल्या तपासणीमध्ये या 112 दस्तांमध्ये साशंकता असल्याचे दिसून आले आहे. या ऐवजांमधील कागदपत्रांची खातरजमा करावी.
ही कागदपत्रे बनावट असल्याची खात्री झाल्यास दस्तांतील संबंधितांवर नोंदणी अधिनियम 1908चे कलम 82 अन्वये गुन्हा नोंद करावी, अशा सूचना नोंदणी विभागाकडून देण्यात आल्या आहेत.