पुणे – पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात मैदानासाठी दर्शविण्यात आलेला ३.५९१ हेक्टरचा भूखंड पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (कात्रज डेअरी) देण्याचा निर्णय झाला आहे. ही जागा मुलांना खेळासाठीच राहू द्यावी, अशी मागणी आज महाविकास आघाडीच्या वतीने पुणे महापालिकेसमोर आंदोलन करून करण्यात आली.
कात्रज येथील क्रीडांगणाचे आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियेसाठी आरक्षण टाकणार असल्याच्या निषेधार्थ पुण्याचे पालकमंत्री व पुणे महापालिका आयुक्त यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी वेगवेगळे खेळ रस्त्यावर खेळण्यात आले. बरेच खेळाडू तेथे उपस्थित होते. त्यानंतर कात्रज येथील डीपीतील मैदानाचे आरक्षण उठवू नये, याबाबत आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पुणे काॅंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना गटाचे (उद्धव ठाकरे गट) गजानन थरकुडे, संजय मोरे, माजी आमदार दिप्ती चवधरी, अड. अभय छाजेड, संगीता तिवारी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, लता राजगुरू, शिवा मंत्री, अजित दरेकर, रजनी त्रिभुवन उपस्थित होत्या.
आंदोलनापासून राष्ट्रवादीचा दुरावा
महाविकास आघाडीकडून हे संयुक्त आंदोलन घेण्यात आले. मात्र, या आंदोलनास राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचा एकही पदाधिकारी उपस्थित राहिला नसल्याने यावेळी काॅंग्रेस तसेच शिवसेनेच्या पदाधिकार्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या विरोधात हे आंदोलन असतानाही कोणीच न आल्याने अखेर शिवसेना आणि काॅग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.