पुणे – आचार्य आनंद ऋषी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) दुमजी उड्डाणपुलाच्या खांबाचे काम पूर्ण झाले आहे. गर्डर टाकण्यास सुरूवात केली जाणार आहे. हे काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवघी तीन मीटरची लेन वाहतुकीसाठी उपलब्ध होणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक टप्प्या टप्प्याने पुढील आठ महिने पर्यायी रस्त्याने वळविण्यात येणार आहे.
यासाठी आज (बुधवारी) महापालिका, पीएमआरडीए तसेच वाहतूक पोलिसांकडून संयुक्त पाहणी केली जाणार आहे. आॅगस्ट २०२४ अखेर काम पूर्ण करण्याचे पीएमआरडीएचे नियोजन असून याबाबत मंगळवारी महापालिकेत महत्वाची बैठक पार पडली.
वाहतूकीसाठी दोन पर्याय
विद्यापीठ चौकात प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्यानंतर विद्यापीठाकडे जाण्यासाठी फर्गुसन रस्त्यावरून कृषी महाविद्यालयातून पुढे सिंचन नगर आणि विद्यापीठातून औंधकडे जातील तर औंधकडून येणारी वाहने स्पायसर महाविद्यालयाकडून खडकीकडून अंडी उबवनी केंद्राकडून शहरात येतील, असे नियोजन प्रस्तावित आहे. तसेच, विद्यापीठ रस्त्यावर केवळ दुचाकी, चारचाकी अथवा अवजड वाहने या पैकी कोणत्याही एका प्रकारच्या वाहनांनाच प्रवेश देण्याचे नियोजन आहे.