पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील उड्डाण पुलावरून जात असताना एका युवकाचा पतंगच्या नायलॉन मांजामुळे अपघात झाला आहे. मयूर चव्हाण असे अपघात झालेल्या तरुणाच नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून नायलॉन मांजा विक्रीस बंदी असतानाही संक्रात सण जवळ येताच अनेक हौशी नागरिक मांजा विकत आणून पतंग उडवितात. पतंग कटल्यास त्याचा मांजा पतंगाबरोबर उडून एखाद्या ठिकाणी अडकतो.
हाच मांजा एखाद्याच्या जीवावर बेतत आहे. नायलॉन मांजामुळे मयूर चव्हाण याच्या उजव्या डोळ्याला जखम झाली आहे. त्यामुळे डोळ्यांना टाके घालण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील दुकानांत नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असल्याचे यातून पुन्हा दिसून आले आहे.