पारगाव -महाराष्ट्रात सध्या गाजत असलेले पारगाव हत्याकांडप्रकरणी शवविच्छेदनाच्या अहवालावर आरोग्य विभाग व त्यांचे डीन यांच्या निष्कर्षाच्या आधारे पुढील तपास करण्यात येईल, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (ख) सुनील फुलारे यांनी सांगितले. पारगाव येथे भीमा नदीपात्रात सातजणांचे मृतदेह टाकण्यात आले. या घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत त्यांनी तपासाच्या सूचना दिल्या.
ते म्हणाले की, सामूहिक हत्याकांडातील मेडिकल रिपोर्ट व फोरेन्सिक टीमची मदत घेण्यात आली असून हा तपास सखोल व शास्रोक्त पद्धतीने सुरू आहे. यात मृतदेहांच्या जखमा, व्हिसेरा पुनर्तपसनीतील अहवाल आदी आमच्या अहवालात प्राप्त होतील. आरोपींच्या वेळा, सुसंगती, प्रत्येकाचा सहभाग याची तपासणी करण्यात येईल. आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मारेकऱ्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणात अजून कोणी मदत केली आहे का याबद्दल कसून तपास सुरू आहे. हत्याकांडातील वापर करण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. उर्वरित जप्ती व घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. पुर्नशवविच्छेदन अहवालाची मागणी करण्यात आली आहे. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत शेडगे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.