राजगुरूनगर- खेड तालुका त्यागाची व पराक्रमाची भूमी आहे. तालुक्यातील जनता चांगले, वाईट याचे भवितव्य ठरवते. विकासाला खीळ घालणाऱ्यांना घरी बसवते, असा टोला आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता लगावला.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचा जाहीर सत्कार खेड तालुक्याच्या वतीने रविवारी (दि. 29) विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते राजगुरूनगर येथे करण्यात आला, त्यावेळी मोहिते पाटील बोलत होते. याप्रसंगी काका पवार, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी सदस्य सुरेखा मोहिते पाटील,
अरुण चांभारे, मंगल चांभारे, बाबा राक्षे, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, प्रतीक मोहिते पाटील, शिवराज राक्षे यांचे वडील काळुराम राक्षे, आई सरपंच सुरेखा राक्षे, शांताराम चव्हाण,अशोक राक्षे यांच्यासह जिल्ह्यातील कुस्ती पटू, राक्षेवाडी, राजगुरुनगर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, राक्षेवाडी -राजगुरुनगर शरहातून महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.शिवराज राक्षे याला खेड तालुक्यातील जनतेच्या वतीने रोख 22 लाख, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वतीने 5 लाख व राक्षेवाडी ग्रामस्थांच्या वतीने 5 लाख असे 32 लाख रुपये महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांना देण्यात आले.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला शासकीय सेवेत चांगल्या पदावर न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून नोकरीचा प्रश्न सोडवला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. आमदार मोहिते म्हणाले की, दिलीप मोहितेंना शह देण्यासाठी तीनवेळा खासदार झालेली व्यक्ती जिल्हा नियोजन समितीवर येते काय, खेड तालुक्याच्या विकासाला खीळ घालण्याचे काम करते काय हे सर्व जनतेला माहिती आहे.
सरकार बदलल्यानंतर तालुक्यातील अनेक विकासकामांना खीळ बसला आहे. 3 कोटीचा पोहण्याचा तलाव महाविकास आघाडीचे सरकार असताना मंजूर झाला होता; मात्र सरकार बदलले आणि हा 3 कोटींचा तलाव त्यात बुडाला, अशी मिश्किल टीका शिंदे सरकरवर केली. मान्यवरांचे स्वागत बाबा राक्षे यांनी, प्रास्ताविक कैलास सांडभोर यांनी, सूत्रसंचालन कैलास मुसळे, आदेश टोपे यांनी तर ऍड. अनिल राक्षे यांनी आभार मानले.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देणार – अजित पवार
खेड तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी आर्थिक अधिवेशनात योग्य भूमिका मांडू. यासह खेड तालुक्यातील विविध प्रश्न समस्या आणि विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे ते आगामी कार्यक्रमात दिले जाईल. उगीचच महापुरुषांचे अपमान करणे, महापुरुषांबद्दल बद्दल बेताल वक्तव्य करणे, वाचाळवीरांची संख्या वाढवणे हे आमच्या रक्तात नाही. उगीचच महापुरुषांचे अपमान करणे, बेताल वक्तव्य करणे आम्ही सहन करणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.