लोणी काळभोर -येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करुन नागरिकांच्या जिवीतास व मालमत्तेस हानी पोहचवणाऱ्या दोघांना पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे जिह्यातून दोन वर्षांकरीता तडीपार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली.
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमित बालाजी सोनवणे (वय 24) व गणेश बाळू भोसले (वय 20, दोघेही रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे तडीपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी मिळून स्वतःची टोळी बनवली असून ते वारंवार गुन्हे करीत आहेत. त्यांच्या विरुद्ध लोणी काळभोर, हडपसर, फरासखाना या पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी, बेकायदा गर्दी जमविणे, दंगा करणे, धमकावणे, विनापरवाना घातक हत्यार, अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, यासारखे गुन्हे दाखल आहेत.
या दोघांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी प्रस्तावाची पडताळणी करून 2 वर्षांकरिता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त बजरंग देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, सुभाष काळे, उपनिरीक्षक अमित गोरे, किरण धायगुडे, हवालदार गणेश सातपुते, संदिप धनवटे यांनी केली आहे.